Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र, मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने उसंती घेतली आहे. त्यामुळे शेतीकामांना वेग आलाय. अशातच ओसरलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत आहे. आज मुंबई, कोकण घाटमाथा तसेच पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे या भागांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
उर्वरित भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीने जारी केलेल्या (IMD Rain Alert) अंदाजानुसार, आज मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक तसेच जळगावसह परिसरात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मुंबईसह उपनगरात (Mumbai Rain News) पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
हे पण वाचा
हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या झारखंड आणि परिसराव चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, अजमेर, ग्वालिअर, चूरक, बालासोर, ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वाहणाऱ्या वाऱ्यांचे जोड क्षेत्र निवळले आहे.
परिणामी आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात रिमझिम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. धरणसाखळी क्षेत्रातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने काही ठिकाणच्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन देखील करण्यात आलंय.