Maharashtra Weather in November: राज्यात थंडीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत असताना आता नोव्हेंबरमध्येही पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सामान्य पाऊस होईल. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
राज्यात परतीच्या पावसाने रजा घेतल्यानंतर थंडीची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे. अशात आता हवामान खात्याकडून राज्याला थेट पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या मासिकात यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा नागरिकांना नोव्हेंबरमध्येही पाऊस अनुभवता येणार आहे.
मंगळवारी पत्रकार परिषदेत IMD, हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंज्य महापात्रा यांनी सांगितले की, नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ‘महाराष्ट्रातील पाऊस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून आर्द्रता आणणाऱ्या हवामान प्रणालीशी संबंधित आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. परिणामी, सामान्य दिवसाच्या तापमानापेक्षा थंड आणि रात्रीच्या तापमानापेक्षा जास्त उबदार होण्याची शक्यता आहे. ईशान्य मान्सूनच्या हवामान प्रणालीमुळे नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडू शकतो’, असंही ते म्हणाले.
जारी केलेल्या अंदाजानुसार, कोकण आणि गोवा आणि विदर्भाच्या काही भागात नोव्हेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. यामुळे पावसामुळे ढगाळ आकाश राहिल तर दिवसाचे तापमान थंड राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान ढगाळ असण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रात दिवसाचे तापमान थंड होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे पण वाचा
ढगाळ वातावरणामुळे, महाराष्ट्रासाठी रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुण्यात नोव्हेंबरमध्ये दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा थंड असेल तर रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल, असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.