Maharashtra Rain : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीवरील कर्नाटकच्या किनारी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
IMD Alert Rain : मागच्या काही दिवसांपासून भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवसांत पूर्व आणि पूर्व मध्य भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ ऑगस्ट रोजी ईशान्य भारतातही पावसाच्या हालचाली वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार वायव्य भारतात २ ते ३ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याचबरोबर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीवरील कर्नाटकच्या किनारी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर पुढील पाच दिवसांत द्वीपकल्पीय भारत आणि पश्चिम भारताच्या उर्वरित भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. दुसरीकडे, देशाची राजधानी दिल्लीमध्ये ढगाळ वातावरणामुळे किरकोळ पावसाची शक्यता आहे.
उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशात मान्सूनच्या पावसाने थैमान घातले आहे त्यामुळे देवभूमीला पुन्हा एकदा अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत शिमला प्रादेशिक विभागाचे शास्त्रज्ञ संदीप कुमार यांनी दिली. ३ आणि ४ ऑगस्टला हिमाचल प्रदेशातील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हे पण वाचा
दरम्यान या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील पावसाची स्थिती ७ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे, असे देखील IMD चे शास्त्रज्ञ संदीप कुमार यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये २ ऑगस्ट, पश्चिम मध्य प्रदेशात २ आणि ३ ऑगस्ट, पूर्व उत्तर प्रदेश १ आणि २ ऑगस्ट तर पश्चिम उत्तरप्रदेशात ३ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
IMD नुसार पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासह आज उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, आसाम आणि मेघालय, कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.