काही राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. तर काही भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पूरग्रस्त तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही चांगलाच गारठा वाढला आहे. एकीकडे थंडीचा प्रभाव वाढत असताना दुसरीकडे हवामान खात्याने काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
‘या’ राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या माहितीनुसार, जोरदार ईशान्येकडील वाऱ्यांच्या प्रभावाखाली, 30 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 पर्यंत किनारपट्टीवर तामिळनाडूवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 आणि 28 डिसेंबर रोजी तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील ६ दिवस तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार, नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
ईशान्येकडील जोरदार वाऱ्यांमुळे आजपासून पुढील ६ दिवस म्हणजेच ३० डिसेंबर २०२३ पर्यंत तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात हलका ते मध्यम पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अरुणाचल प्रदेश, पंजाब, हरियाणामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्लीतील तापमानात मोठी घट
ख्रिसमस आणि वर्षअखेरीच्या सुट्ट्या जसजशा जवळ येत आहेत, तसतसे दिल्लीतील तापमानात घसरण होत आहे. रविवारी दिल्लीचे किमान तापमान ७.६ अंश सेल्सिअस होते. भारतीय हवामान विभागाने 25 ते 28 डिसेंबर दरम्यान दाट धुके राहण्याची शक्यता वर्तवली आहे. 29 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत हलके धुके राहील आणि किमान तापमानात काही अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रविवारी पश्चिम, उत्तर आणि पूर्व राजस्थानच्या काही भागांमध्ये दाट ते दाट धुके दिसून आले. येत्या दोन-तीन दिवसांत राज्याच्या उत्तर आणि पूर्व भागात विविध ठिकाणी दाट धुके पडण्याची आणि किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. ३१ डिसेंबरपासून राज्यात आणखी एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा
महाराष्ट्रात काय परिस्थिती?
राज्यात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. राज्यात गारठा कायम असून उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तापमानाचा पारा दहा अंशांखाली आहे. राज्याच्या किमान तापमानात वाढ होणार असल्याने गारठा काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नैऋत्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ चक्राकार वाऱ्यांची स्थिती दक्षिणेकडे सरकली आहे. उत्तर भारतात थंडी कमी झाली असून रविवारी (ता. २४) पंजाबमधील अमृतसर, हरियानातील भिवणी, नर्मूल येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये अनेक भागांत किमान तापमान ६ ते ९ अंशांदरम्यान आहे.
राज्याच्या किमान तापमान कमी जास्त होत असून विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. रविवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात
राज्यातील नीचांकी ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, निफाड येथील गहू संशोधन केंद्र, गडचिरोली येथे १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी (ता. २५) राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
राज्य गारठले (किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ११.३, धुळे ८.५, जळगाव १२.६, कोल्हापूर १६.३, महाबळेश्वर १५, नाशिक १३.६, निफाड ९.१, सांगली १४.२, सातारा १३.४, सोलापूर १५.९, सांताक्रूझ १८.९, डहाणू १८.८, रत्नागिरी २०.५, छत्रपती संभाजीनगर ११.८, नांदेड १५, परभणी १२.२, अकोला १३.३, अमरावती १३, बुलडाणा १४, ब्रह्मपुरी १३, चंद्रपूर ११.२, गडचिरोली ९.८, गोंदिया १२.२, नागपूर १३.२, वर्धा १३, वाशीम १२, यवतमाळ १२.२.